अकाेला - राज्यात सरकार स्थापनेवरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरू असतानाच अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शनिवारी जिल्ह्यात आलेल्या परिवहन व खारभूमी विकास मंत्री दिवाकर रावते यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांवर शेतकऱ्यांनी ‘तुम्हा लाेकांना मुख्यमंत्री पदाचे वेध लागले आहेत’ अशा शब्दांत ‘बाण’ साेडले. यावर मंत्री रावते यांनीही ‘तुम्ही काँग्रेसचे आहात काय’, असा सवाल केला. त्यामुळे संतप्त झालेल्या एका युवा शेतकऱ्याने तुम्ही ‘येथे काँग्रेसचा विषय कशाला काढता’, असा प्रश्न केला. काही वेळानंतर पळसाे (बढे) येथे झालेली ही शाब्दिक चकमक थांबली आणि मंत्री रावते यांनी नुकसान भरपाईसाठी मुख्यमंत्री व उपसमितीला सविस्तर पत्र देऊन नुकसान भरपाईचे आश्वासन दिले. पळसाे हे गाव केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपचे नेते संजय धाेत्रे व आमदार रणधीर सावरकर यांचे गाव आहे.
मंत्री दिवाकर रावते यांनी अकाेला व मूर्तिजापूर तालुक्यातील काही शेतात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी गुडधी, सांगळूद, दहिगाव (गावंडे), काैलखेड (जहागीर), जामठी फाटा, माना, कुरुम या भागातील नुकसानाची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला. शेतात साेंगणी करुन ठेवलेले साेयाबीन भिजले असून, यातून उत्पादन हाेणार नाही. खरीप पीक व विम्यासाठी जवळचे संपूर्ण पैसे संपले आहे, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. त्यामुळे आेला दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. मंत्री रावते यांनीही शेतात साेयाबीन काढणीनंतर उरलेल्या खुणा, साेंगणीनंतर शेतात आेले झालेल्या साेयाबीनची पाहणी केली. त्यांनी पंचनामा करताना केवळ शेतात असलेल्या पिकांचाच विचार न करता साेंगल्यानंतर आेला झालेला शेतमालाही गृहीत धरण्यात येईल, असेही रावते म्हणाले. आठ दिवसांपूर्वीच शिवसेना आमदार नितीन देशमुख, आमदार गाेपीकिशन बाजाेरीया यांनी नुकसानीबाबत माहिती दिली हाेती, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पत्रकारांशी बाेलताना सांगितले
. तातडीने मदत द्या
पीक नुकसानाची पाहणी, पंचनामा, सर्वेक्षणाशिवाय नुकसान भरपाई निश्चित करता येत नाही, हे जरी मान्य असले तरी ताेपर्यंत तातडीने मदत द्यावी, असे मंत्री रावते म्हणाले. सरकारने नंतर वाटल्यास ती नुकसान भरपाईतून वळती करावी. याचे पत्र उपसमितीला पाठवणार आहे, असेही मंत्री रावते यांनी या वेळी बोलताना सांगितले.
सत्तासंघर्षात शेतकऱ्यांकडे नाही दुर्लक्ष
सध्या राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षामुळे पीक नुकसानीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष हाेत आहे काय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ‘सत्ता स्थापन हाेण्याच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष हाेण्याचा प्रश्नच उदभवत नसल्याचे परिवहन मंत्री रावते यांनी स्पष्ट केले. मी सध्या मंत्रीपदी कायम असून, कार्यकाळ ९ नाेव्हेंबरपर्यंत असल्याचेही ते त्यांनी या वेळी सांगितले. पश्चिम विदर्भ, खांदेश, मराठवाड्यासह इतरही भागात माेठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले.