अकोला : दिव्य मराठीच्या 'मौन सोडू चला बोलू' अभियानांतर्गत 22 डिसेंबर रोजी अशोक वाटिका ते अशोक वाटिका चौक नाइट वॉक आयोजित केला आहे. उद्घाटन रात्री साडे नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान अशोक वाटिकेतील सभागृहात होईल. या नाइट वॉकमध्ये सहभागी होण्यासाठी हजारो रातरागिणी सज्ज झाल्या आहेत.
या नाइट वॉकमध्ये शहरातील डॉक्टर, वकील, अभियंते, शिक्षिका, प्राध्यापक, पारिचारिका, श्रमिक महिला, अंगणवाडी सेविका, विद्यार्थीनी, गृहिणी विविध क्षेत्रातील महिला स्वयंस्फूर्तीने सहभागी होणार आहेत. अशोक वाटिकेतील सभागृहात उद्घाटन होईल. रात्री काम करणाऱ्या पाच महिलांच्या हस्ते उद्घाटन पार पडेल. त्यानंतर पथनाट्य, एकांकिका, भारुड, मनोगत व्यक्त केले जाईल. दहा ते साडेदहाच्या दरम्यान प्रत्यक्ष रॅलीला प्रारंभ केला जाईल. ही रॅली अशोक वाटिकेतून निघून जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय मार्गे, देवराव बाबा चाळ, गजानन महाराज मंदिर, वसंत टॉकीज, पंचायत समिती, अग्निशमन विभाग कार्यालय, राणीसती धाम, जिल्हाधिकारी कार्यालय चौक मार्गे अशोक वाटिका चौकात आल्यावर या रॅलीचा समारोप होईल. नाइट वॉक दरम्यान विविध संस्थांकडून विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यात सहभागी होणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका उपलब्ध राहील. अशोक वाटिकेच्या सभागृहात चहा, बिस्किट, पाण्याची व्यवस्था केली आहे.
रातरागिणींसाठी या ठिकाणी पार्किंग
या नाइट वॉकमध्ये गोरक्षण रोड, खदान परिसर, सिव्हिल लाईन या भागातून सहभागी होणाऱ्या महिलांनी आपल्या वाहनांचे पार्किंग अशोक वाटिका चौकातील वाहतूक पोलिस कक्षाच्या बाजूने, तर जुने शहर, नवरंग सोसायटी, जठारपेठ, राऊत वाडी आदी भागातून येणाऱ्या महिलांनी अशोक वाटिकेसमोरील मोकळ्या जागेत पार्किंग करावी. आपापल्या वाहनांना निट लॉक करावे.
सहभागी होताना ही घ्या काळजी
रातरागिणींनी स्वत:साठी पाण्याची बॉटल, थंडीमुळे उबदार कपडे, गरजेची औषधे सोबत ठेवावी. दमा-अस्थमा, संधिवात आदींसह विविध व्याधिग्रस्त रातरागिणींनी शक्यतो त्यांना जेवढे शक्य होईल तेवढेच नाइट वॉकमध्ये चालावे. प्रकृती अस्वस्थ असताना नाइट वॉकचा पूर्ण मार्ग चालण्याची गरज नाही.
रातरागिणींनी केले उत्स्फूर्त नियोजन
२२ डिसेंबरला होणाऱ्या नाइट वॉकबाबत रातरागिणींमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. महिला हिरीरीने कामाला लागल्या आहेत. नाइट वॉकमध्ये सहभागी होणाऱ्या रातरागिणींनी उत्स्फूर्तपणे नियोजन केले आहे. काही रातरागिणी भारत माता, जिजाऊ, सावत्रीबाई फुले, झांशीची राणी, रमाई, अहिल्यादेवी होळकर, आदिशक्ती आदींची वेशभूषा धारण करणार आहे.
रात्री ९ वाजता उपस्थित रहावे
नाइट वॉकमध्ये सहभागी होणाऱ्या रातरागिणी रात्री ९ ते साडेनऊच्या दरम्यान अशोक वाटिकेतील सभागृहात उपस्थित राहतील. विविध वेशभूषेत येणाऱ्या रातरागिणींनी वेशभूषा करूनच अशोक वाटिकेतील सभागृहात उपस्थित रहावे.
कॉलेजकुमारी होणार स्वयंस्फूर्तीने सहभागी
शहरामधील विविध महाविद्यालय, तंत्र निकेतन आदींमधील विद्यार्थीनी दै. दिव्य मराठीने आयोजित केलेल्या या नाइट वॉकमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.