डाॅ. आंबेडकर जयंती घराघरात साजरी करावी : अॅड. प्रकाश आंबेडकर

अकोला. महात्मा ज्योतिबा फुले जयंती व १४ एप्रिलची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यंदा एकत्रितरित्या समुहाने बाहेर येवून साजरी करू नये. कोरोनाचा धोका वाढेल, असे कोणतीही कृती करू नये, घराघरांमध्ये जयंती साजरी करावी, जयंतीनिमित्त जे पैसे जमा झालेत, ती रक्कम सफाई कामगार, आरोग्य सेवक असे जे घटक कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून काम करताहेत, अशा हातावर पोट असणाऱ्या समुहाला द्यावा, त्यांची चूल विझणार नाही, याची काळजी घ्यावी, या गरजू लोकांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू देण्यात याव्यात, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.


अॅड.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशभर कोरोनाचा धोका वाढला आहे. अनेक वर्षापासून महात्मा फुले जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती एकत्रित साजऱ्या केल्या जातात. या वर्षी जगभरामध्ये कोरोना व्हायरस पसरलेला आहे. लोकांमध्ये भीती आहे. एकत्र आलो तर हा वाढेल, याबाबतही संभ्रम आहे. फुले शाहू आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की कोरोना व्हायरस पसरणार नाही याची आपली सुद्धा जबाबदारी आहे. त्यामुळे सार्वत्रिक ठिकाणी एकत्र ऐवून जयंती साजरी करू नये. जयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी निधी जमा करण्यात आलेला आहे. महिनाभरापासून लॉकडाऊन आहे. पूर्णपणे दडणवळण थांबले आहे. सफाई कर्मचारी, आरोग्य सेवक यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून स्वच्छता ठेवण्याचे काम केले आहे. आरोग्य जपण्याचे काम केले आहे. अशा जणांचे जगवणे आणि मदत करणे महत्वाचे आहे. अनेक जणांचे पोट हातावार आहे. दरदिवशी कमवतात, तेव्हा त्यांची चूल पेटते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्यानिमित्ताने यांची घरातील चूल पेटत राहील उपाशी राहणार नाहीत, अर्धपोटी राहणार नाहीत याची दक्षता आपण घ्यावी. जयंतीच्या निमित्ताने जो निधी जमला आहे. त्यातून अन्नधान्य, राशन पुरवा. अर्थव्यवस्था कोलमडलेली आहे. तिला रुळावर येण्यासाठी अनेक महिने लागतील आपण तोपर्यंत या घटकाला मदत करीत राहले पाहिजे, असेही आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.